BJP expels former Rajasthan MLA Gyandev Ahuja : भारतीय जनता पक्षाने माजी आमदारा ज्ञानदेव आहुजा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि एक दलित व्यक्ती टिकाराम जुली यांनी भेट दिल्यानंतर अलवर मंदिरात त्यांनी गंगाजल शिंपडून ‘शुद्धीकरण’ केले होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून याची दखल घेत त्यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे की, “माजी आमदार ज्ञानदेव आहुजायांचा बेशिस्तपणा सिद्ध झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.” भाजपाच्या राज्य शिस्तपालन समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि अहुजा यांच्याबद्दलचा रिपोर्ट राठोड यांना सोपवला असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

जुली यांच्या भेटीनंतर ७ एप्रिल रोजीरामगडचे माजी आमदारा आहुजा यांनी अलवर येथील राम मंदिराचे शुद्धिकरण केले होते. आहुजा यांनी त्यांना ‘हिंदुत्वविरोधी’ आणि ‘सनातनविरोधी’ असल्याचे म्हटले होते. तसेच अहुजा यांनी मंदिरात गंगाजल शिंपडत असताना ‘जय सिया राम’ अशा घोषणा देखील दिल्या होत्या. या संपूर्ण घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “हे भगवान श्री रामाचे मंदिर आहे ज्यांच्या चरणी मी गंगाजल शिंपडले. गंगाजल का? कारण काही अशुद्ध लोक येथे आले होते.”

आहुजा यांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्ष नेते राहुल गांधी यांनीही त्यावर तीव्र शब्दात टीका केली होती.

मात्र आहुजा यांनी यानंतर स्वतःचा बचाव करताना आपण काहीही चुकीचे केले नाही असे म्हटले होते. तसेच त्यांची कृती काँग्रेस पक्षाविरुद्ध होती, अशा दावाही त्यानी केला होता. “जर मी काही चुकीचे केल्याचा थोडासाही पुरावा असेल तर… मी माझ्या मिशा काढायला तयार आहे,” असे ते म्हणाले होते.