* भाजप नेत्यांकडून पाठराखण, मात्र पक्षात कुरबुरी कायम
* बेताल वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही खडसावले
पूर्ती उद्योग समूहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आज दिवसभर त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी अक्षरश: सळो की पळो करून सोडले. मात्र, दिवस सरता सरता भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत गडकरींची पाठराखण करत पक्षाच्या कोअर ग्रूपने त्यांची सोडवणूक केली. अर्थात, बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची अनुपस्थिती आणि पक्षांतर्गत दबक्या आवाजातील सूर यामुळे गडकरींवरील टांगती तलवार कायम आहे. दुसरीकडे, विवेकानंदांबद्दलच्या विधानावर माफी मागितल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तोंड सांभाळून बोला’ अशा शब्दांत गडकरींची कानउघाडणी केली.

पूर्ती उद्योग समूहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंगळवारी दिवसभर चाललेल्या नाटय़मय व वेगवान घडामोडींमध्ये नितीन गडकरींचे अध्यक्षपद गेलेच, असा माहोल भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तयार केला होता. मात्र, भाजप मुख्यालयात सायंकाळी कोअर ग्रुपच्या दोन तास चाललेल्या बैठकीत संघाचे तत्त्वचिंतक आणि आर्थिक विश्लेषक एस. गुरुमूर्ती यांनी गडकरी यांच्या पूर्ती समूहाशी संबंधित सर्व दस्तऐवजावर आपले म्हणणे मांडले. या कथित भ्रष्टाचारात गडकरी यांचा कायदेशीर किंवा नैतिक संबंध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी निवेदन प्रसिद्ध करून गडकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचा निर्वाळा दिला.
मात्र, गडकरींवरील आरोपांच्या मुद्यावर पक्षात मतभेद कायम आहेत. राम जेठमलानी यांनी मंगळवारी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गडकरींविरुद्ध तोफ डागली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीशी जसवंत सिंह, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या नेत्यांचीही सहमती असल्याचा दावा करीत जेठमलानी यांनी गडकरींवर राजीनाम्यासाठी दबाव आणला.  त्यातच, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गडकरींची पाठराखण करण्याचे टाळण्यासाठी अडवाणी सायंकाळी कोअर ग्रुपच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत.     
संघाकडून कानउघडणी
स्वामी विवेकानंद आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांची कथित तुलना केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कानउघडणी केली. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या विभूतींना जगभरात मान्यता आहे, जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही विधान करताना भान ठेवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, या विधानाने उद्भवलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी गडकरी यांनी मंगळवारी जाहीर माफी मागितली.