BJP Donation in 2023-24 : निवडणूक रोखे असो अथवा थेट देणग्या, प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या झोळीत हजारो कोटी रुपये पडत असल्याचं गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. २०२३-२४ मध्ये भाजपाला हजारो कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षांत भाजपाला मिळालेल्या देणग्यांमध्ये २०२३-२४ मध्ये तब्बल ८७ टक्के वाढ झाली आहे. भाजपाला तब्बल ३,९६७.१४ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. पक्षाला मिळालेल्या एकूण देणग्यांमधील निवडणूक रोख्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसत आहे. भाजपाच्या २०२३-२४ च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून (ऑडिट) ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार भारतीय जनता पार्टीला २०२२-२३ मध्ये २,१२०.०६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०२३-२४ मध्ये या देणग्या जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अहवालानुसार भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १,६८५.६२ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपाला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी ४३ टक्के हिस्सेदारी निवडणूक रोख्यांची आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १२९४.१४ कोटी रुपये मिळाले होते. २०२२-२३ मध्ये भाजपाला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी ६१ टक्के हिस्सा हा निवडणूक रोख्यांचा होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्ड) योजना घटनाबाह्य ठरवत रद्द केली होती.

निवडणुकीमुळे खर्चही वाढला, केवळ जाहिरातींवर ५९१ कोटींचा खर्च

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाला मिळालेल्या देणग्यांमध्ये वाढ झाली आहे, त्याचबरोबर त्यांच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. २०२४ हे निवडणुकांचं वर्ष होतं. त्यामुळे या वर्षात निवडणूक प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च होतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार भाजपाने गेल्या वर्षी १,७५४ कोटी रुपये खर्च केले. २०२२-२३ मध्ये भाजपाने १,०९२ कोटी रुपये खर्च केले होते. भाजपाने गेल्या वर्षी ५९१ कोटी केवळ जाहिरातींवर खर्च केले आहेत.

काँग्रेसच्या देणग्यांमध्ये ३२० टक्के वाढ

भाजपासह इतर पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती देखील समोर आली आहे. सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांमध्ये भाजपानंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे. काँग्रेसला २०२३-२४ मध्ये १,१२९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. २०२२-२३ च्या तुलनेत यात तब्बल ३२० टक्के वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला २६८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.