कर्नाटक मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले असून सत्तारूढ भाजपचे आणखी ११ आमदार सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने कर्नाटकमधील भाजपच्या सरकारला घरघर लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाल्यास आपण उचित कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटक सरकार अल्पमतात गेल्याचा दावा केला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री सी. एम. उदासी आणि ऊर्जामंत्री शोभा करांदलाजे यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सदर दोन मंत्री अन्य ११ आमदारांसह विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात राजीनामा सादर करण्यासाठी गेले.
भाजपचे आमदार राजीनामे सादर करण्यासाठी आले असता विधानसभा अध्यक्ष के. जी. बोपय्या आणि विधिमंडळाचे सचिव ओमप्रकाश हे कार्यालयात उपस्थित नव्हते. सदर आमदारांनी जवळपास तासभर प्रतीक्षा केली. ही माहिती कळताच येडियुरप्पा तातडीने तेथे रवाना झाले आणि त्यांनी शेट्टर सरकार अल्पमतात गेल्याचा दावा केला. विधिमंडळातील सचिवांनी आपले राजीनामा पत्र स्वीकारावे अथवा राजीनामा स्वीकारण्याचे आपल्याला अधिकार नाहीत अशा आशयाचे पत्र द्यावे, अशी आग्रही मागणी संतप्त आमदारांनी केल्याने विधिमंडळ कार्यालयाजवळ गदारोळ माजला होता. आपण सहसचिव आहोत, आपल्याला राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अध्यक्ष आल्यानंतर येऊन राजीनामे सादर करावे, अशी विनंती सहसचिव जयतीर्थ गलाली यांनी आमदारांना केली.
मुख्यमंत्री शेट्टर यांचे सरकार अल्पमतात गेले असल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी आपला दौरा आटोपता घ्यावा आणि बंगळुरूला येऊन पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येडियुरप्पा यांनी केली. आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याची कल्पना बोपय्या यांना दिली असतानाही ते दौऱ्यावर गेल्याबद्दल येडियुरप्पा यांनी त्यांच्यावरही टीका केली. कर्नाटकातील सरकार निर्लज्ज आहे, शेट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या सरकारचा राजीनामा द्यावा. हे सरकार अल्पमतात गेले असल्याने ते सत्तेवर राहू शकत नाही, असे आम्ही राज्यपालांना सांगणार असल्याचेही येडियुरप्पा म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाल्यास आपण उचित कारवाई करण्याच्या तयारीत आहोत, असे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, आपण जगदीश शेट्टर सरकार अस्थिर करणार नाही. शेट्टर यांच्याशी आपण चर्चा केली असून त्यांनी आपले सरकार सुस्थितीत असल्याचे सांगितले, असेही राज्यपाल म्हणाले. येडियुरप्पा यांचे समर्थक मंत्री आणि आमदारांशी शेट्टर यांचे वर्तन चांगले नव्हते, शेट्टर यांच्या वर्तनामुळे ते दुखावले आहेत. त्यामुळे आता कर्नाटक जनता पक्षाला बळकट करण्याची वेळ आली आहे, असे सी. एम. उदासी म्हणाले.
तथापि, शेट्टर यांनी आपले सरकार येत्या ८ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका मे महिन्यात होणार आहेत. उदासी आणि करांदलाजे या मंत्र्यांसह नेहरू ओलेकर, थिप्पेस्वामी, बी. पी. हरिश, एच. हलप्पा, सुरेश गौडा पाटील, एस. आय. चिक्कणगौडर, सुरेश, जी. शिवण्णा, चंद्रप्पा, व्ही. एस. पाटील आणि बसवराज पाटील अत्तुर हे आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

Story img Loader