पीटीआय, लखनौ : महापालिका निवडणुकीत भाजपने कितीही डावपेच लढवले तरी त्यांना शहरी भागांबाहेर फारसे यश मिळाले नाही. उलट त्यांचा तेथे दारूण पराभव झाल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी केली.अखिलेश यांनी रविवारी या संदर्भात केलेल्या ‘ट्वीट’मध्ये समाजवादी पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना नमूद केले, की महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या समाजवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांचे आणि भाजपविरुद्ध लढून विजयी झालेल्या इतर सर्व उमेदवारांचेही हार्दिक अभिनंदन.
यादव यांनी नमूद केले, की शहराबाहेरील जागांवर सर्व डावपेच लढवूनही भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने राज्यातील सर्व १७ महापालिकांचे महापौरपद एकतर्फी काबीज केले. तर एक हजार ४२० नगरसेवक पदांपैकी ८१३ जागा जिंकल्या. या शिवाय भाजपने ८९ नगरपरिषदांचे आणि १९१ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या तुलनेत समाजवादी पक्ष किंवा अन्य विरोधी पक्षांना महापौरपदाची एकही जागा जिंकता आली नाही, तर समाजवादी पक्षाने महापालिकांत १९१ नगरसेवकपदांवर विजय मिळवला. ३५ नगरपरिषदांचे आणि ७९ नगरपंचायत अध्यक्षपदी समाजवादी पक्षाला यश मिळाले आहे.