गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पाटीदार समितीच्या नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे कथित सेक्स व्हिडिओज व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, भाजपकडे पाटीदार नेत्यांच्या अशा आणखी ५२ सीडीज आहेत, असा आरोप दिनेश बांभानिया यांनी केलाय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांना हार्दिक पटेल यांना बलात्कार प्रकरणात अडकवायचे आहे. हार्दिक यांची अवस्था नारायण साई यांच्यासारखी व्हावी, असे भाजपला वाटत असल्याचे बांभानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता भाजप नेते या आरोपांना कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कालच दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी एक पत्र लिहून हार्दिक यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. या सीडी पाहता राजकारण आणि राजकारणी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हे दिसून येते. गुजरातमधील संपूर्ण यंत्रणा एका नेत्याचा आवाज दाबून टाकण्यासाठी कार्यरत आहे. भाजपने या निवडणुकीत सेक्स व्हिडिओजकडे नव्हे तर २०१२ मध्ये दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्ती झाली, यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते, असे जिग्नेश यांनी म्हटले होते.
सेक्स सीडींमुळे गुजरातमधील राजकारण रसातळाला- जिग्नेश मेवाणी
तत्पूर्वी काल नवी दिल्ली येथे भाजपच्या उमेदवारांची निश्चित करण्यासाठी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाही. काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होत आहे.