देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपकडून यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यातच विरोधी पक्षदेखील लोकसभा निवडणुकीसाठी चांगलाच सक्रीय झाला आहे. यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘खेला होबे’ म्हणत भाजप हटावची घोषणा दिली आहे. भाजपच्या पराभवाची सुरुवात पश्चिम बंगालमधून होणार आहे, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
“आता मी, नितीश कुमार, अखिलेश यादव, हेमंत सोरेन सर्व सोबत आले आहोत. जे लोक २७५ ते ३०० जागा निवडूण येतील म्हणून गर्वांची भाषा करत आहेत, त्यांना माहिती पाहिजे की, राजीव गांधीच्या जवळ ४०० लोकसभेच्या जागा होत्या. मात्र, राजीव गांधी त्या संभाळू शकले नाहीत. लोकसभेला ३०० च्या खासदार निवडूण आणण्याची भाषा करणाऱ्यांना ५ राज्यांमध्ये १०० जागांवर पराभवाचा सामना करावा लागणार आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची भिती दाखवणाऱ्यांना जनतेचे सरकार धडा शिकवेल,” असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे.
विरोधकांना एकत्र करण्यासाठी नितीश कुमारांच्या भेटीगाठी
दरम्यान, बिहारमध्ये नुकतीच भाजपची साथ सोडून नितीश कुमार यांनी राजदसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून नितीश कुमार विरोधकांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माकपचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली आहे.