हुबळी (कर्नाटक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडी-एस) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की या चर्चेच्या फलनिष्पत्तीतून भावी राजकीय घडामोडी निश्चित होतील.
‘एनडीए’मध्ये जेडी (एस)ला सामील करून घेणार आहात का? असे विचारले असता बोम्मई यांनी सांगितले, की या संदर्भात आमचे नेतृत्व आणि जेडी(एस)चे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्याच चर्चा सुरू आहे. जेडी(एस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी या संदर्भात सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. त्या दिशेने चर्चा सुरूच राहील. या चर्चेच्या फलनिष्पत्तीवर आगामी राजकीय घडामोडी निश्चित होतील. अलीकडेच लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांत सामंजस्य होण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पुरेसे संकेत मिळाले आहेत.
भाजपचे कर्नाटकातील प्रभावी ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही यापूर्वी या शक्यतेला दुजोरा देत सांगितले होते, की त्यांचा पक्ष आणि जेडी(एस) राज्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध एकत्र लढतील. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले होते, की योग्य वेळी लोकसभा निवडणुकीसाठी उभय बाजूने निर्णय घेतला जाईल.
कर्नाटकातील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील एकूण २८ जागांपैकी २५ जागा जिंकून विजय मिळवला, तर एका जागेवर त्याचा पाठिंबा असलेल्या अपक्षांनी विजय मिळवला. काँग्रेस आणि जेडी(एस) ला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.
विरोधी पक्षनेत्याची निवड १८ जुलैनंतर?
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत झालेल्या विलंबासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले, की ही नियुक्ती बहुधा १८ जुलैनंतर होऊ शकते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अद्याप विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली नाही. या दिरंगाईबद्दल राज्यातील सत्ताधारी काँग्रेससह विविध स्तरातून भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे.