मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून भाजपाची पोलखोल करणारे व्हिडिओ दाखवल्यानंतर आता भाजपानेही मनसेवर ट्विटरवरुन पलटवार केला आहे. भाजपाने मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसंदर्भात प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे व्हिडिओ ट्विट केले आहे. “काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का”, असे म्हणत भाजपाने मनसेला थेट इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील आठवड्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज ठाकरे यांचा सभा चर्चेचा ठरत आहे. पुराव्यांसकट राज यांनी केलेले ‘स्मार्ट’ भाषण लोकांना आकर्षित करत आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. यावरुन भाजपानेही आता मनसेवर पलटवार केला आहे.

भाजपाने गुरुवारी रात्री पहिला व्हिडिओ ट्विट केला. डोंबिवीलीत मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भातील बातमी भाजपाने ट्विट केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप फेरीवाला संघटनांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. हा व्हिडिओ ट्विट करताना भाजपाने म्हटलंय की, “काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का …! ‘मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते’ #लावरेव्हिडीओ ”

मनसेने शुक्रवारी दुपारी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात मनसेची पदाधिकारी साडी चोरतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. “मनसे कार्यकर्ते साडी चोरताना” #लावरेव्हिडिओ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या राज्यातील दौऱ्यातील सर्वाधिक गाजलेले वाक्य म्हणजे ‘लाव रे तो व्हिडिओ’. राज ठाकरे यांच्यासंदर्भात सर्च करताना हे वाक्य सर्च करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे. रिलेटेड क्वेरी म्हणजेच राज ठाकरेंच्या नावाबरोबर सर्वाधिक सर्च होणारे शब्दांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ पहिल्या क्रमांकावर आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp hits back mns tweets video says we too have few video lav re to video