गोव्यातील खनिजांच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आल्यामुळेच रुपयाची घसरण झाल्याची जाणीव केंद्रास झाल्याप्रकरणी भाजपने केंद्र सरकार आणि काँग्रेसवर ठपका ठेवला असून या पेचप्रसंगास काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
गोव्यातील खाणींतील उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळेच रुपयाची घसरण झाल्याची सबब केंद्र सरकारने सांगितली आणि अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्याचा पाठपुरावा केला. निर्यात थांबल्यामुळेच हे घडले, असे अर्थमंत्र्यांना वाटते काय, अशी विचारणा प्रदेश भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी येथील मुख्यालयात केली. गोव्यातील खाणींच्या पेचप्रसंगासही काँग्रेसच जबाबदार आहे, असाही आरोप सावईकर यांनी केला. खाणींसंबंधी समस्या असल्याचे त्यांना खरोखरच भान असते तर त्यांनी ही बाब योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली असती आणि आतापर्यंत राज्यातील खाणींवरील बंदीही उठली असती, असा दावा सावईकर यांनी केला. न्या. एम.बी.शाह आयोगाने राज्यातील बेकायदा खाणींसंबंधी आपला अहवाल संसदेत सादर केल्यानंतर वन आणि पर्यावरणमंत्री जयंती नटराजन् यांनी घाईगर्दीतच खाणींची पर्यावरणीय अनुमती रद्दबातल ठरविली आणि या समस्येत अधिकच भर पडली, असाही आरोप त्यांनी केला.