संयुक्त पुरोगामी आघाडीतील अनेक घटक पक्ष संपर्कात असल्याचा दावा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे. १७५ पेक्षा जास्त जागा आम्ही मिळवल्या, तर अनेक जुने मित्र पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परततील, असा विश्वास वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली होईल. तसेच महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी काँग्रेस नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब करण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप गडकरींनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडीचे वर्णन त्यांनी बुडते जहाज असे करत, या जहाजाला गळती लागल्यावर त्यांचे मित्र सोडून जाणारच, असा टोला लगावला. आम्ही सर्वाच्या संपर्कात आहोत, असा दावा त्यांनी केला. नेमक्या कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहोत हे त्यांनी स्पष्ट केले नाही. तसेच आता तसा कुठलाही प्रस्ताव नाही हे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, नॅॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय लोकदल हे काँग्रेसचे काही प्रमुख मित्रपक्ष आहेत. त्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गडकरी यांच्या पूर्ती समूहाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, असे वक्तव्य या कार्यक्रमात पवार यांनी केले होते. राष्ट्रीय लोकदल एके काळी भाजपसोबत होता. नॅशनल कॉन्फरन्सने भाजपसोबत जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. राजकारणाचे वर्णन गडकरींनी सोय, सक्ती, मर्यादा आणि विरोधाभास यांचा खेळ असल्याचे केले.
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये भाजपचे विशेष अस्तित्व नाही. मात्र त्या राज्यांत भाजप लोकसभेच्या सगळ्या जागा लढवणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट
केले.
‘राजकीय षड्यंत्र’
पूर्ती समूहाच्या निधीवरून भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याची आठवण करून देताच हे आपल्या विरोधात राजकीय षड्यंत्र होते, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर वर्षभरात एकही नोटीस आलेली नाही किंवा कार्यवाही सुरु झालेली नाही. कुठलाही आरोप ठेवलेला नाही. निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्यामुळे पक्षाची कोंडी व्हायला नको म्हणून राजीनामा दिल्याचे गडकरींनी सांगितले.माध्यमांनाही आपण दोषी असल्याचे चित्र रंगवले याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली.