वृत्तसंस्था, कलबुर्गी
‘‘शहरी नक्षलवाद्यांची टोळी काँग्रेस पक्ष चालवत आहे,’’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार प्रतिहल्ला केला. ‘‘भाजप हा दहशतवाद्यांचा पक्ष आहे,’’ अशी तिखट टीका खरगे यांनी शनिवारी कर्नाटकच्या कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना केली. भाजप हा पक्ष लोकांचे झुंडबळी घेतो, त्यांना मारहाण करतो आणि अनुसूचित जाती व जमातीच्या जनतेवर अत्याचार करतो असे आरोपही खरगेंनी केले.

काँग्रेसवर नक्षलवाद्यांचे नियंत्रण आहे अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केली होती. त्याविषयी विचारले असता खरगे म्हणाले की, ‘‘ते नेहमीच असे बोलतात, आताही ते असेच बोलत आहे. (लोकसभा निवडणूक निकालानंतर) आतापर्यंत ते गप्प होते, (हरियाणातील विजयामुळे) थोडे चैतन्य मिळाल्यानंतर ते आम्हाला शहरी नक्षलवादी म्हणत आहेत. ते बुद्धिवादी आणि प्रगतशील लोकांना नक्षलवादी म्हणतात, ते काँग्रेसलाही शहरी नक्षलवादी म्हणतात. ती त्यांची सवय आहे.’’ पुढे ते म्हणाले की, ‘‘मोदींचा स्वत:चा पक्ष दहशतवाद्यांचा आहे. ते झुंडबळी घेतात, लोकांना मारहाण करतात, अनुसूचित जातीच्या लोकांच्या तोंडामध्ये मूत्रविसर्जन करतात, आदिवासी जनतेवर बलात्कार करतात. त्यांचा पक्ष दहशतवादी पक्ष आहे. अशी कृत्ये करणाऱ्या लोकांना ते पाठिंबा देतात, त्यानंतर ते इतरांवर टीका करतात.’’ मोदी लोकांबद्दल कमी आणि पक्षाबद्दल जास्त बोलतात असेही ते म्हणाले.

हेही वाचा : बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांची दखल, परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त

खरगे यांच्या टिप्पणीवर कर्नाटकातील ज्येष्ठ भाजप नेते रवीकुमार यांनी टीका केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी आणि नक्षलवादी घटनांमध्ये ८० ते ९० टक्के घट झाली आहे असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही खरगेंच्या टीकेला उत्तर दिले. ‘‘काँग्रेस पक्ष नेहमी दहशतवाद्यांनाबरोबर राहिला आहे, तेच आता आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी स्वत:कडे पाहावे,’’ असे सिंह म्हणाले.