चार दशके ज्या पक्षामध्ये घालवली त्या पक्षाशी असलेले संबंध आठवडय़ापूर्वी तोडल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना आता भारतीय जनता पक्ष काँग्रेस व जनता दलापेक्षा अधिक राक्षसी असल्याचे वाटत असून भविष्यात कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. ७० वर्षांचे येडियुरप्पा ९ डिसेंबरला हावेरी येथे कर्नाटक जनता पार्टी या आपल्या पक्षाची स्थापना करणार आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेले येडियुरप्पा यांना दक्षिण भारतात भाजपला सत्तेवर आणण्याचे श्रेय दिले जाते. भविष्यात महात्मा गांधी, आंबेडकर व जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनुसार वाटचाल करण्याचा इरादा बोलून दाखवताना येडियुरप्पांना भाजपबरोबरचे संबंध विसरता येत नव्हते. ते म्हणाले की, नगरपालिका अध्यक्षपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत भाजपने मला सर्व काही दिले. पक्ष नेत्यांनी मात्र कायम माझ्या विरोधात काम केले.    

Story img Loader