मुस्लिम समाजातील ‘तिहेरी तलाक’ हा मुद्दा भाजप राजकीय फायद्यासाठी वापरत आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून अशाप्रकारचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन याला विरोध करावा, असे आवाहन एएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवेसी यांनी तिहेरी तलाकसह विविध मुद्दयांना हात घातला. ते म्हणाले, भाजप राजकीय फायद्यासाठी तिहेरी तलाकचा वापर करत आहे. मुस्लिम महिलांनी जागृत झाले पाहिजे. सर्व मुस्लिम महिलांनी एकजुटीने त्याला विरोध करावा, असे त्यांनी म्हटले.
गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधील परिस्थिती हिंसक बनलेली आहे. अजूनही केंद्र व राज्य सरकारला तेथील परिस्थिती नियंत्रित करता आलेली नाही. भाजप आणि पीडीपी सरकारला तिथे शांतता निर्माण करण्यास अपयश आलेले आहे हाच त्यातून स्पष्ट अर्थ निघतो.
काश्मीरमध्ये जे कोणी शाळा पेटवून देत आहेत ते फक्त काश्मीरचेच नव्हे तर मानवतेचेही ते शत्रू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने अशा लोकांना पकडले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, तिहेरी तलाकचा मुद्दा हा हिंदू विरुद्ध मुसलमान किंवा भाजप विरुद्ध इतर पक्ष असा नसून स्त्रियांच्या सन्मानाचा आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्दय़ावर नुकताच मत प्रदर्शन केले होते.
प्रसारमाध्यमांनी, विशेषत: दूरचित्रवाहिन्यांनी तिहेरी तलाकच्या मुद्दय़ाला ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ किंवा ‘भाजप विरुद्ध इतर पक्ष’ असे स्वरूप देऊ नये, असे आवाहन करून मोदी म्हणाले की, महिलांवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार होऊ नयेत आणि धर्माच्या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाऊ नये, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले आहे. लोकशाहीत चर्चा व्हायला हवी. सरकारने या मुद्दय़ावर आपली भूमिका मांडली आहे. ज्यांना तलाकच्या मुद्दय़ावरून विषयांतर करायचे आहे, ते लोकांना चिथावणी देत आहेत. देशातील मुसलमान महिलांचे आयुष्य तिहेरी तलाकमुळे उद्ध्वस्त होण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले होते.

Story img Loader