आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधत पक्षासमोरील अडचणीत वाढ केली आहे. भाजपा माझा पक्ष आहे पण राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रिमो लालूप्रसाद यादव हे आपल्या कुटुंबीयांसारखे असल्याचे मत शत्रुघ्न सिन्हा यांनी नोंदवले आहे. राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे विविध अर्थ काढण्यात येत आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे भाजपा सोडून राजदमध्ये सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सर्वांना आर्श्चयाचा धक्का देत बुधवारी राजदकडून आयोजित इफ्तार पार्टीत ते सहभागी झाले होते. याबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी, तेजप्रताप आणि मिसा भारती हे सर्वजण माझे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्या आमंत्रणामुळेच मी इफ्तार पार्टीत सहभागी झालो आहे. भाजपा माझा पक्ष होऊ शकतो, पण हे लोक (लालू कुटुंबीय) माझे कुटुंबीय आहेत.
काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा हे राजदमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते अनेकवेळा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना दिसतात. लालूप्रसाद यादव हे आपले अत्यंत चांगले मित्र असल्याचे ते नेहमी म्हणतात. परंतु, आपण लालूंच्या पक्षाच्या जाण्याच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. मी भाजपातच राहणार असून पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, तेजस्वी यादव यांनीही भाजपा आता शत्रुघ्न सिन्हा यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप केला होता. बिहारसाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी खूप काही केले आहे. त्यांना लोक बिहारी बाबू म्हणूनच ओळखतात, असे कौतुकाचे शब्दही त्यांनी काढले होते. शत्रुघ्न सिन्हा हे सन्मानित नेते असल्याने कोणीही त्यांना आपल्याकडे घेऊ इच्छित असतील. पण निर्णय जो घ्यायचा आहे तो त्यांना घ्यायचा असल्याचेही ते म्हणाले होते.