माझ्या हययातीतच अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, अशा आशयाचे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर २४ तासांच्या आत याच मुद्द्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपवर टीका केली. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी भाजप गंभीर नाही. त्यांना केवळ राजकारण करण्यासाठीच या मुद्द्याचा वापर करायचा आहे. प्रभू रामालाही ते पक्षाचा सदस्य असल्यासारखेच वागवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले, केवळ राजकारण करण्यासाठीच भाजपकडून हा मुद्दा कायम चर्चेत आणला जातो. संबंधित न्यायालयाचा निकाल आणि दोन्ही धर्मांतील नेत्यांमध्ये एकमत झाले तरच अयोध्येत राम मंदिर उभारणे शक्य होणार आहे. हे माहिती असतानाही ते केवळ राम मंदिर उभारण्याचे आश्वासन देतात. पण कधी ते सांगत नाहीत. हा विषय जिवंत ठेवण्यासाठीच त्यांच्याकडून हा प्रयत्न केला जातो. त्यांना खरंच रामाबद्दल किती प्रेम आहे, हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत भाजपकडून फारसे काही प्रयत्न केले गेलेले नाहीत. पण त्याचा राजकीय फायदा घेण्याचे काम भाजपने कायम केले आहे, असाही आरोप त्यांनी केला.