जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० कलम आपणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजून सांगितले. त्यामुळेच आता भाजप ३७० व्या कलमावर शांत आहे, असा दावा करतानाच पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी जो मसुदा मांडला होता, त्याच्या आधारे तो प्रश्न सोडवता आला असता पण मुशर्रफ यांच्या प्रयत्नांना भारतानेच खो घातला, असे खळबळजनक विधान भाजपचे नेते व राज्यसभा खासदार  राम जेठमलानी यांनी केले आहे.
ते म्हणाले, की काश्मीरसाठी ३७० व्या कलमाची स्वतंत्र तरतूद राज्यघटनेत आहे. जम्मू-काश्मीरच्या घटनासमितीच्या इच्छेनुसार ती समाविष्ट करण्यात आली. आता त्याला कुणी हात लावू शकत नाही. काश्मीर समितीच्या मते कलम ३७० रद्द करता येणार नाही. काश्मीरमध्ये आलेल्या सरकारांनी या कलमातील बदलांना विरोध कधीच केला नाही. जर तुम्हाला कुठल्या तरतुदी पटत नसतील, तर त्या लोकशाही मार्गाने काढल्या पाहिजेत. भाजप सत्तेवर आल्यानंतर जितेंद्र सिंग यांनी हे कलम रद्द करण्याची भाषा केली होती पण मोदींना आपण आधीच ३७० वे कलम समजून दिले असल्याने त्यांनी या मंत्र्यांला बोलावून कानउघाडणी केली नंतर भाजपकडून ३७० व्या कलमावर कुठलेही वक्तव्य कुणी केलेले नाही.
दरम्यान, काश्मीर समस्येचे निराकरण करण्यासंदर्भात परवेझ मुशर्रफ यांनी एक प्रस्ताव आणला होता, तो त्यांनी आमच्या समान मित्रांमार्फत काश्मीर समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याकडे पाठवला आपण त्यात दुरुस्त्या केल्या. त्याही मुशर्रफ यांनी मान्य केल्या पण त्या वेळी मंत्री असलेल्या एका नेत्याने त्यात खोडा घातला, असा आरोपही जेठमलानी यांनी केला आहे.

Story img Loader