पीटीआय, महुवा (गुजरात) : ‘‘आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. या देशावर त्यांचा पहिला हक्क आहे. भाजप त्यांचा हक्क हिरावून घेत आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे सोमवारी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्या प्रचारसभेत राहुल बोलत होते. सुरत जिल्ह्यातील महुवा येथे आदिवासींच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले.
राहुल गांधी म्हणाले, की भारत जोडो यात्रेत असंख्य शेतकरी, तरुण आणि आदिवासींना भेटल्यानंतर त्यांच्या वेदना समजून घेता आल्या. त्यांच्या समस्या-दु:ख जाणवले. भाजप आदिवासींना ‘वनवासी’ असे संबोधतो. तुम्ही आदिवासी म्हणजे भारताचे पहिले रहिवासी-मालक आहात. पण भाजप तसे संबोधत नाही. तुम्ही जंगलात राहता, असे ते म्हणत नाहीत. तुम्हाला हा फरक जाणवतो का? याचा अर्थ तुम्ही शहरात राहावे असे त्यांना वाटत नाही. तुमची मुले अभियंता, वैद्यकीय व्यावसायिक, वैमानिक बनावेत, त्यांनी इंग्रजी शिकावे, असे त्यांना अजिबात वाटत नाही. तुम्ही जंगलातच राहावे, अशी भाजपची इच्छा आहे. पण ते तेवढय़ावरच थांबणार नाहीत. त्यानंतर ते तुमच्याकडून जंगलही हिरावून घेण्यास सुरुवात करतील. असेच चालू राहिले तर आणखी पाच-दहा वर्षांत दोन-तीन उद्योगपतींच्या ताब्यात सर्व जंगल जाईल. तुम्हाला राहायलाही जागा उरणार नाही. शिक्षण, आरोग्य आणि नोकऱ्याही मिळणार नाहीत, असेही राहुल यांनी सांगितले.