सत्ताधारी भाजपचा कणा मानल्या जाणाऱ्या लेवा पटेल समाजाची मते विभागली जाण्याच्या भीतीने सध्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची झोप उडवली आहे. या समाजाचे सर्वात मोठे नेते केशुभाई पटेल यांनी भाजपशी फारकत घेऊन स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे सत्तेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या सौराष्ट्रमध्ये लेवा पटेल समाजाचा कौल कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्काला उधाण आले आहे.
राज्यात १८ टक्के लोकसंख्या ही पटेल समाजाची आहे. या समाजाने गेली दोन दशके सातत्याने आपला कौल भाजपला दिल्यामुळे गेली १८ वर्षे हा पक्ष सत्तेवर विराजमान आहे. मात्र या वेळी पटेल समाज हा लेवा आणि कडवास या दोन उपजातींमध्ये विभागला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्याचा परिणाम भाजपच्या मताधिक्क्य़ावर होण्याची शक्यता आहे.
मोदींशी खटके उडाल्यानंतर भाजपतून बाहेर पडत स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे केशुभाई पटेल (८३) हे लेवा या उपजातीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मोदींची सत्ता मोडून काढण्यासाठी ते आपल्या समाजाची मदत घेण्यावर भर देत आहेत. मात्र असे असले तरी नरेंद्र मोदी किंवा केशुभाई पटेल यांच्यापैकी कुणाचा पक्ष या समाजाची मते आपल्याकडे खेचेल, याबाबत राजकीय गोटात अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील १८२ पैकी ५४ जागा या सौराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सौराष्ट्रातील भावनगर, अमरेली, जुनागड, जामनगर, पोरबंदर, सुरेंद्रनगर आणि राजकोट या जिल्ह्य़ांतील मतदारसंघांवर जो पक्ष आपले वर्चस्व दाखवेल, तोच पक्ष राज्यात सत्तेची सूत्रे हाती घेईल, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळेच आता सौराष्ट्रातील पटेल समाजाची मते नेमकी कोणाला मिळणार याकडे साऱ्या राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे.   

Story img Loader