काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. देवरा यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर भाजपाकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट टाकून राहुल गांधी यांना टोला लगावला. ते म्हणाले, “न्याय यात्रा काढण्याऐवजी आधी स्वपक्षातील नेत्यांना न्याय द्या.”

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आजपासून भारत जोडो न्याय यात्रा हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार आहेत. यात्रा पूर्व ते पश्चिम दिशेने १५ राज्यांमधून जाईल आणि मुंबईमध्ये समाप्त होईल. आज सकाळी काँग्रेस नेते विमानाने दिल्लीहून मणिपूरला रवाना झाले. यावेळी विमानात बसलेल्या काँग्रेस नेत्यांचा घोषणाबाजी देतानाचा एक व्हिडिओ काँग्रेसने एक्सवर टाकला होता. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींसह अनेक काँग्रेसनेते बसल्याचे दिसून येत आहे.

हे वाचा >> मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप-शिंदे गटात संघर्ष?

दरम्यान अमित मालवीय यांच्यासह भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही काँग्रेसला लक्ष्य केले. “कांग्रेसमध्ये “राम” उरलेला नाही, हे मिलिंद देवरांच्या उशीरा का होईना लक्षात आले आहे”, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर टाकून काँग्रेसला टोला लगावला आहे.

आणखी वाचा >> मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रितिक्रिया; म्हणाले, “मला माहिती नाही..”

दरम्यान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्सवर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये मिलिंद देवरा म्हणाले, “आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे. इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”