बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून एनडीएतील प्रमुख नेत्यांच्या बैठका चालू आहेत. जदयू, भाजपा, हिंदुस्तान आवाम मोर्चा, उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष आणि चिराग पासवान यांच्या पक्षात रस्सीखेच चालू होती. अखेर एनडीएतील सर्वपक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. बिहारमध्ये एनडीएत जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला एक, उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षाला एक, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला एक जागा दिली जाणार आहे. यासह नितीश कुमार संयुक्त जनता दल पक्षाला १६ जागा दिल्या जाणार आहेत. तर उर्वरित २० जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणूक लढवतील.
दरम्यान, पशुपती पारस यांच्या पक्षाला एनडीएने एकही जागा दिलेली नाही. भाजपा पशुपती पारस यांना राज्यपाल बनवण्याच्या विचारात आहे. तसेच समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज यांना बिहारच्या मंत्रिमंडळातील मंत्री बनवण्याची ऑफर देण्यात आली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रिन्स राज हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आहेत. वडील रामचंद्र पासवान यांच्या निधनानंतर प्रिन्स राज समस्तीपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु, २०२१ मध्ये त्यांचा लोक जनशक्ती पक्ष फुटला. त्यानंतर प्रिन्स राज यांनी पशुपती पारस यांच्याशी घरोबा केला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. चिराग पासवान आणि मंगल पांडेय हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीपूर्वी मंगल पांडेय यांनी पशुपती पारस यांच्याबरोबर जागावाटपावर चर्चा केली होती. दरम्यान, चिराग पासवान हे हाजीपूरमधून लोकसभा लढवू शकतात.
हे ही वाचा >> भाजपाकडून महाराष्ट्रातल्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नव्या चेहऱ्यांना संधी, मोदींचं धक्कातंत्र!
भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यांमधील तसेच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. भाजपाने सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकिट दिलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी देण्यात आली आहे. त्या बीडची लोकसभा लढवतील.