१३ जागांवर काँग्रेसची मते निर्णायक

नवी दिल्ली : ‘आम आदमी’चे नाव घेऊन गेली बारा वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या ‘आप’ला बाजूला सारत दिल्लीकर मतदारांनी विधानसभेची सत्ता भाजपच्या हाती सोपवली. निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यानच, सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर देऊ केलेल्या प्राप्तिकर मुक्तीचा दिल्लीच्या निकालावर सुस्पष्ट परिणाम दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाचा पारंपरिक मतदारवर्ग, मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या मतांच्या लाटेवर स्वार होत भाजपने ४८ जागी विजय मिळवला. या लाटेशी झुंज देत ‘आप’ने २२ जागांवर मजल मारली खरी; पण हे करताना पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांसारखे मोहरे गारद झाले. या धुमश्चक्रीत निष्प्रभ ठरलेल्या काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळा मिळाला.

भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली. दिल्ली आता दशकभरापासूनच्या ‘आप-दा’तून मुक्त झाल्याचा टोला लगावला. नवे सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेल अशी अपेक्षा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

केजरीवाल, सिसोदिया पराभूत

२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत ७० जागांपैकी ४८ जागा जिंकत भाजपने सत्ताधारी आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला. दिल्ली विधानसभेत सलग दहा वर्षे सत्ता राबवणाऱ्या ‘आप’ला २२ जागा जिंकता आल्या. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभवच झाला असे नव्हे तर ‘आप’चे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज अशा ‘आप’च्या दिग्गज नेत्यांनाही नामुष्कीजनक हार पत्करावी लागली. भाजपच्या लाटेत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी कशाबशा बचावल्या व त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. यंदाची दिल्लीतील निवडणूक अटीतटीने लढली गेली, निकालावर मात्र भाजपने एकतर्फी शिक्कामोर्तब केले. भाजपने तब्बल ४० जागांची उडी घेतली. २०२० मध्ये भाजपला फक्त ८ जागा मिळाल्या होत्या. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. मात्र, त्यानंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्ली या तीनही राज्यांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले.

मतांच्या टक्केवारीत चुरस

‘आप’ने २०२० मध्ये ७० पैकी ६२ जागा तर ५४ टक्के मते मिळवली होती. पण, यावेळी ‘आप’च्या मतांचा टक्का १० ने घसरून ४३ टक्क्यांवर आला. तर, भाजपच्या मतांमध्ये सुमारे ८ टक्क्यांची वाढ झाली. भाजपच्या मतांचा टक्का ३८ वरून ४६ टक्क्यांवर पोहोचला. काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्यांची भर पडली, मतांचा टक्का साडेचार टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर गेला. काँग्रेसला ना जागा मिळवता आल्या, ना मतांच्या टक्केवारीत मोठी भर घालता आली. त्यामुळे तिरंगी वाटणारी लढत दुहेरीच होत काँग्रेस पुन्हा एकदा निष्प्रभ ठरला!

दिल्लीमध्ये ५ फेब्रुवारीला ६०.५४ टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानामध्ये २.५ टक्क्यांची घसरण झाली. या घसरलेल्या मतदानाचा फायदा सत्ताधारी ‘आप’ला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपच्या मध्यमवर्गाला दिलेल्या करमुक्तीच्या खैरातीला यश आल्याचे सिद्ध झाले. भाजपने आप व केजरीवाल यांच्याविरोधात भ्रष्टाचार, गैरकारभार, कामचुकार प्रशासन, नागरी समस्या आदी मुद्द्यांचा प्रचार केला होता.

प्रवेश वर्मा मुख्यमंत्री?

नवी दिल्ली मतदारसंघामध्ये ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार मतांनी पराभव करणारे भाजपचे प्रवेश वर्मा जायंट किलर ठरले. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा यांच्याबरोबरच विजेंद्र गुप्ता यांचेही नाव घेतले जात आहे. २०१५ व २०२० च्या ‘आप’च्या झंझावातातही गुप्ता जिंकून आले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जाईल. ज्यांनी पैशाची लूट केली तो त्यांना परत करावा लागेल.

घोटाळे लपविण्यासाठी रोज नवे षड्यंत्र ‘आप’दावाले करीत होते. दिल्लीकर जनतेच्या प्रेमामुळे भाजप सत्तेत आला आहे. आता विकास वेगाने होईल. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान