उत्तराखंड सरकारच्या ओबीसी आयोगाचे सदस्य आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे नेते तसेच त्याच्या एका सहकाऱ्याने मिळून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर हरीद्वार येथे सामूहिक बलात्कार आणि खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा मृतदेह रुरकी-हरीद्वार महामार्गाजवळ आढळून आला. पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत, स्थानिक भाजपा नेता आणि राज्य सरकारच्या ओबीसी आयोगाच्या सदस्यावर या प्रकरणी बलात्कार आणि खूनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच भाजपा नेत्याचा एक सहकारीही या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आदित्य राज सैनी आणि अमित सैनी यांच्यावर आरोप ठेवले गेले आहे.
पीडितेच्या आईने आरोप केल्यानंतर उत्तराखंड भाजपाने सदर व्यक्तीला पक्षातून आणि ओबीसी आयोगाच्या सदस्यपदावरून हटविले आहे. तसेच दोन्ही आरोपींवर भारतीय दंड विधान कायद्याचे सामूहिक बलात्कार आणि खून तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण
हरीद्वार पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. प्रकरणाचा वेगाने तपास करण्यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली असून शहर पोलीस अधीक्षक योग्य वेळी माहिती देतील, असे पोलिसांनी सांगितले आहे. “प्रत्येक पथकाकडे वेगवेगळी कामे देण्यात आली आहेत. वैज्ञानिक आणि इतर पुरावे गोळा करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. निष्पक्ष पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला जाईल. तसेच कोणताही हलगर्जीपणा न करता या प्रकरणात गोवलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, अशी प्रतिक्रिया हरीद्वारचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोभाल यांनी दिली.
या प्रकरणी अद्याप किती लोकांना अटक करण्यात आली, याची माहिती शहराचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. या प्रकरणात ज्यांची नावे घेतली गेली आहेत, त्यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांना ताब्यात घेतले जात आहे. तसेच उत्तरीय तपासणीनंतरच पीडित मुलीच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असेही स्वतंत्र कुमार म्हणाले.
बुधवारी भाजपाचे उत्तराखंड प्रदेश सरचिटणीस आदित्य कोठारी यांनी भाजपा नेत्याची हकालपट्टी केली असल्याचे पत्र जाहिर केले. “प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट यांच्या सूचनेनुसार ओबीसी मोर्चाचे कार्यकारी सदस्य आदित्य राज यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे. तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यपदही रद्द करण्यात येत आहे”, असे ते म्हणाले.
सदर प्रकरण बाहेर आल्यानंतर काँग्रेसने मात्र जोरदार टीका केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला. “उत्तराखंडमध्ये गेल्या काही काळापासून महिलांवरील गुन्हे वाढत आहेत”, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या गरीमा मेहरा यांनी केला.