भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत सोनाली फोगट यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना फोगट यांच्या मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. हे फुटेज गोव्यातील एका रेस्टॉरंटमधील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांना व्यवस्थित चालता येत नसल्याचं दिसत आहे. त्या आरोपी सुधीर सांगवानचा आधार घेऊन चालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्यासोबत दुसरा साथीदार सुखविंदर सिंगही असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

संबंधित सर्वांनी सोमवारी रात्री अंजुना बीचवरील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर तिघंही येथून बाहेर पडले होते, सोनाली फोगट यांना चालता येत नव्हतं. त्या आरोपी सुधीर सांगवानची मदत घेत चालत होत्या. त्या शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनाक्रमानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली फोगट यांना गोव्यातील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत दाखल करण्यात आलं.

हेही वाचा- सोनाली फोगट यांच्या मृत्युप्रकरणी दोघांवर हत्येचा गुन्हा; शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद

आरोपी सुधीर सांगवान हा सोनाली फोगट यांना पाण्यातून काहीतरी विषारी पदार्थ बळजबरीने देत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोगट यांचा मृत्यू होण्यापूर्वी संबंधित आरोपी तिला सर्वजण राहत असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी फोगट यांना उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. पण फोगट यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली.

तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून फोगट यांच्या शरीरावर काही जखमा आढळल्याचं डॉक्टरांनी नमूद केलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.