Brij Bhushan Singh: हरियाणा विधानसभेची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते ब्रिजभूषण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेसवर आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभेला तिकीट नाकारलं होतं. ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

यातच आता कुस्तीपटू विनेश फोगट आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणामधून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. यावरूनच ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेससह माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “पांडवांनी द्रौपदीचा ज्या प्रकारे वापर केला त्या प्रकारे काँग्रेस कुस्तीपटूंचा वापर करत आहे”, असा आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : BJP advises Brij Bhushan: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या विरोधात बोलू नका; भाजपाची ब्रिजभूषण शरण सिंह यांना समज

ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले?

माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी हुड्डा कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाभारताच्या काळात पांडवांनी द्रौपदीचा ज्या प्रकारे वापर केला, त्या प्रकाने काँग्रेस कुस्तीपटूंचा वापर करत आहे. मात्र, आजपर्यंत देशाने पांडवांना माफ केलं नाही. काँग्रेस आणि हुड्डा कुटुंबाने आमच्या बहिणी आणि मुलींचा सम्मान डावावर लावला आहे. मात्र, येणाऱ्या काळात यांनाही जनता माफ करणार नाही”, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूने केले आहेत. माझ्यावर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करण्यात आले आहेत, असंही ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

भाजपाची ब्रिजभूषण शरण सिंह यांना समज

माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी वर्षभरापूर्वी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनही केलं होतं. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांचं कुस्ती महासंघाचं अध्यक्षपद गेलं होतं. तसेच त्यानंतर भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही नाकारलं. त्यामुळे आता ब्रिजभूषण सिंह हे कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात आक्रमक होत टीका करत असल्याचं बोललं जात आहे. यातच विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेसकडून निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. यावरूनच गेल्या काही दिवसांपासून ब्रिजभूषण सिंह हे काँग्रेस आणि विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर कडवी टीका करत आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर टीका नको, याचा फटका हरियाणामध्ये बसू शकतो, या पार्श्वभूवीर ब्रिजभूषण सिंह यांना कुस्तीटूंच्या विरोधात काहीच न बोलण्याची समज भाजपाच्या वरिष्ठांनी नेत्यांनी दिली असल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader