Dilip Ghosh Marriage : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे वयाच्या ६१ व्या वर्षी लग्न करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप घोष हे भाजपाच्या कार्यकर्त्या रिंकू मजूमदार यांच्याशी लग्न करणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान दिलीप घोष आणि रिंकू मजूमदार हे एकत्र आले होते. तेव्हा पासून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु होत्या.
माहितीनुसार, दिलीप घोष यांचा विवाह सोहळा त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी साधेपणाने पार पडणार आहे. दिलीप घोष हे ज्यांच्याशी लग्न करणार आहेत, त्या रिंकू मजूमदार या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत. भाजपा महिला मोर्चाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेली आहे. तसेच पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने जनसत्ताने दिलं आहे.
वृत्तांनुसार, दिलीप घोष हे रिंकू मजूमदार यांना बऱ्याच काळापासून ओळखतात. मागील लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांच्या पराभवानंतर देखील रिंकू मजूमदार यांनी त्यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाल्यानंतर ते लग्नासाठी तयार नव्हते. पण त्यांच्या कुटुंबाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिलीप घोष यांना त्यांच्या लग्नाबद्दल काही प्रश्न विचारले असता त्यावर त्यांनी विनोदी शैलीत प्रश्नाचे उत्तरं दिली. दिलीप घोष म्हणाले की, “का? मी लग्न करू शकत नाही का? लग्न करणं गुन्हा आहे का?”, असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं. तसेच असं सांगितलं जात आहे की हा लग्न सोहळा अतिशय खासगी पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे. दिलीप घोष हे रिंकू मजूमदार यांच्याशी त्यांच्या न्यूटाऊन निवासस्थानी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे.