FIR against Kanhaiya Kumar : भाजपाकडून काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्याविरोधात बिहारची राजधानी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
या तक्रारीमध्ये भाजपाच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, कन्हैया कुमार यांनी एका खाजगी टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस बद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि बेजबाबदार वक्तव्य केली. भाजपाचे बिहारमधील मीडिया प्रभारी दानिश इकबाल यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाकडून पोलिसांकडे कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती करण्यात आली होती.
नोव्हेंबरमध्ये होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार हे काँग्रेसचा चेहरा ठरू शकतात.
कन्हैय्या कुमार जे ‘तुकडे-तुकडे गँग’चा भाग आहेत त्यांनी ११ एप्रिल रोजी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी आणि आरएसएस यांच्यासह त्यांच्या विचारधारेबद्दल अपमानजनक भाषा वापरली, हे आक्षेपार्ह आणि अस्वीकार्य आहे, असे इकबाल म्हणाले आहेत. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इकबाल म्हणाले, “एका खाजगी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, ‘तुकडे-तुकडे गँग’चा भाग असलेल्या कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसविरुद्ध अपशब्द वापरले आणि त्यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले. मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना विचारू इच्छितो की, तुम्ही याबद्दल गप्प बसणार आहात की या देशद्रोह्यांना काबूत ठेवणार आहात?'”
आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा अशी मागणी केली आहे. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील, असेही इकबाल म्हणाले.
कन्हैया कुमार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करताना, इकबाल यांनी दावा केला की जेएनयूच्या माजी विद्यार्थ्याच्या वक्तव्यातून जनतेच्या भावना दुखावण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा त्याचा हेतू दिसून येतो.
माजी जेएनयू विद्यार्थी कन्हैया कुमार यांच्या वक्तव्यातून जनतेच्या भावना दुखावणे आणि अशांतता निर्माण करणे हा त्यांचा हेतू दिसून येतो असा दावाही इक्बाल यांनी केला आहे. याबरोबरच त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी देखील केली आहे. “भाजपाच्या पाटणा येथील कार्यालयात इतर सहकारी कार्यकर्त्यांसह ही मुलाखत पाहाताना आम्हाला यामधील वक्तव्ये खूपच आक्षेपार्ह वाटले. कार्यालयातील इतरही अनेक जण हे पाहून नाराज जाले होते, असेही इक्बाल म्हणाले.