काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या एका विधानामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गौतम अदाणी यांच्या कंपनीत शेल कंपन्यांद्वारे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी विचारला. संबंधित व्यक्तीला शोधून त्याला अटक करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केला.
दरम्यान, भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी अजब वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांना बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा शाप लागला, असं विधान गिरीराज सिंह यांनी केलं. राहुल गांधींना उद्देशून गिरीराज सिंह म्हणाले, “तुम्ही माफीही मागत नाही आणि जातीसूचक वक्तव्यही करता… पण मोदी परिवार पूर्ण देशात आहे. बिहार, ओडिशा आणि झारखंडसह संपूर्ण देशात मोदी समुदाय आहे. त्यामुळे आपल्याला एखाद्या समुदायाचा अवमान करण्याचा अधिकार कुणी दिला? नरेंद्र मोदींना शिवी देता-देता, तुम्ही देशातील संपूर्ण समुदायाला शिवी देऊ लागलात. ओबीसीला शिवी देऊ लागले. शिवाय मी माफी मागणार नाही, मला काहीही पश्चाताप नाही, असं राहुल गांधी कोर्टात म्हणाले. त्यांनी माफी मागितली असती, तर आजचा दिवस आला नसता.”
‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना गिरीराज सिंह पुढे म्हणाले, “राहुल गांधींजी तुम्हाला लालू प्रसाद यादव यांचा शाप लागला आहे. २०१३ मध्ये लालू प्रसाद यांच्याशी संबंधित चारा घोटाळ्याचा निकाल लागला होता. त्यांची सदस्यता रद्द होणार होती. पण राहुल गांधी हे लालू प्रसाद यादव यांना भेटत नव्हते. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने ते भेटत नव्हते. त्याचवेळी मला कुणीतरी सांगितलं की, लालू प्रसाद यादव यांनी तेव्हाच राहुल गांधींना शाप दिला होता. आज लालू प्रसाद यादवांचा शाप त्यांना (राहुल गांधींना) लागला आहे.”