अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रविवारी अप्रवासी भारतीयांच्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधींनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर बोट ठेवत संघाला आणि भाजपाला लक्ष्य केलं होतं. दरम्यान, या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानेही राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते गिरीराज सिंह यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, देशद्रोह्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा कधीच समजणार नाही, अशी प्रतिक्रिया गिरीराज सिंह यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले गिरीराज सिंह?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राहुल गांधी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना काही विचारू शकतील, असं काही तंत्रज्ञान असेल, तर त्यांनी जाऊन विचारावं किंवा त्यांनी इतिहास चाळून बघावा. संघाबाबत जाणून घेण्यासाठी राहुल गांधींना शंभर जन्म घ्यावे लागतील. एक देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा कधीच समजू शकत नाही. राहुल गांधी विदेशात जाऊन केवळ भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलातना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला लक्ष्य केलं होतं. “RSS ला वाटतं की भारत ही एक कल्पना आहे. आम्हाला वाटतं की भारत म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. आम्हाला वाटतं प्रत्येकाला सहभाग घेण्याची संधी मिळायला हवी, स्वप्न पाहण्याची संधी मिळायला हवी. जात, धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाला त्याची जागा मिळायला हवी. हा खरा लढा आहे”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा – Rahul Gandhi in US: राहुल गांधींचा अमेरिकेत भाजपा व संघावर हल्लाबोल; म्हणाले, “आरएसएसला वाटतंय की…”
पुढे बोलताना, “हा लढा निवडणूक काळात मूर्त स्वरुपात आला. तेव्हा लाखो लोकांना स्पष्टपणे दिसलं की देशाचे पंतप्रधान राज्यघटनेवर हल्ला करत आहेत. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण संघराज्य, भाषांचा आदर, धर्मांचा आदर, संस्कृतींचा आदर, जातीचा आदर हे सगळं राज्यघटनेत आहे. यातला प्रत्येक शब्द राज्यघटनेत आहे”, असं म्हणत या सर्वांवर झालेला हल्ला म्हणजे राज्यघटनेवरचा हल्ला असल्याची भूमिका राहुल गांधींनी मांडली होती.