BJP leader Gyandev Ahuja : केरळमधील वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी मोठं भूस्खलन होऊन अनेक गावे उध्वस्त झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी वायनाडचा दौरा करून पीडित नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचे सांगितले. तसेच लोकसभेतही वायनाडमधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र आता राजस्थानचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव आहुजा यांनी भलतेच विधान करून वाद ओढवून घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केरळच्या वायनाडमधील दुर्घटनेवर बोलताना आहुजा म्हणाले, “तिथे गोहत्या होत होत्या, त्यामुळे निसर्गाचा कोप झाला. ज्या ज्या ठिकाणी गोहत्या होतात, त्या त्याठिकाणी अशाच घटना घडत राहतील. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्येही आता अशा घटनांची संख्या वाढली आहे. तिथे तर ढगफुटीही होते. मात्र वायनाड सारखी भयानक परिस्थिती या राज्यांमध्ये ओढविली नाही.”

हे वाचा >> अहमदनगरच्या मेजर सीता शेळकेंची वायनाडच्या बचाव कार्यात मोठी कामगिरी; ३१ तासांत नदीवर उभारला पूल

३० जुलै रोजी वायनाडच्या मुंडक्कई, चुरलमाला आणि मेप्पडी या गावांत भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या. ज्यामध्ये आतापर्यंत ३५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही शेकडो लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. दुर्घटना घडल्यापासून विविध यंत्रणा येथे बचाव कार्य करण्यात गुंतल्या आहेत.

जिथे गोहत्या, तिथे कोप होणार

भाजपा नेते ज्ञानदेव आहूजा म्हणाले की, जर केरळमध्ये गोहत्या थांबल्या नाहीत, तर निसर्गाचा कोप असाच सुरू राहणार. २०१८ पासून तिथे अशा घटना घडत आहेत. भारतात जिथे जिथे गोमातेची हत्या होईल, तिथे तिथे आपल्याला कोप पाहायला मिळेल.

हे ही वाचा >> Wayanad Landslide : वायनाडमध्ये निसर्गाचं रौद्ररुप! रस्त्यावरुन धावणाऱ्या रुग्णवाहिकांचा ताफा, काळजात धडकी भरवणारा Video Viral

कोण आहेत ज्ञानदेव आहुजा?

ज्ञानदेव आहुज हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभेचे आमदार राहिले होते. अनेक हिंदू संघटनांशी त्यांचा संबंध आहे. हिंदुत्ववादी असलेल्या आहुजा यांनी याआधीही अशी वादग्रस्त विधाने केलेली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader gyandev ahuja says cow slaughter reason behind wayanad landslide kvg