K Annamalai flogs himself: तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या (DMK) सरकारविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी कोईम्बतूर येथील निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेतले. काल (दि. २६ डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची घोषणा केली होती. द्रमुक सरकारचा पाडाव करत नाही तोपर्यंत अनवाणी रहाणार असून पुढील ४८ दिवस उपवास करण्याचा निर्णय अण्णामलाई यांनी जाहीर केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने अण्णामलाई यांचा स्वतःला चाबकाचे फटके मारण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
के. अण्णामलाई यांनी आज कोईम्बतूर येथील निवासस्थानाबाहेर हिरव्या रंगाचे पारंपरिक ‘मुंडू’ वस्त्र परिधान करत उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेतले. यावेळी भाजपाचे काही पदाधिकारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा निषेध करणारे फलकही कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाबाहेरील फेरीवाल्याने विद्यापीठातील तरूणीवर लैंगिक अत्याचार केला होता. अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारेही फलक भाजपा कार्यकर्त्यांनी हाती धरले होते.
चाबकाने स्वतःला मारून घेतल्यानंतर अण्णामलाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्यांना तमिळ संस्कृतीची समज आहे, त्यांनाच माझ्या आंदोलनाचा अर्थ समजेल. स्वतःला फटके मारणे, स्वतःला कठोर शिक्षा देणे, हे एका चिवट विधीसारखे आहे. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ही कृती कुणाच्याही विरोधात नाही, तर राज्यात गेल्या काही काळापासून सतत वाढत चाललेल्या अन्यायाविरोधातील कृती आहे. अण्णा विद्यापीठातील विद्यार्थीनीशी झालेला गैरव्यवहार हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे.
अनवाणी राहण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले, बराच विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कठोर परिश्रम करत आहेतच, त्याशिवाय एका मोठ्या शक्तीसमोर स्वतःला समर्पित करणेही गरजेचे आहे, असे मला वाटते.
तमिळनाडूचा गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा असेल तर २०२६ मध्ये द्रमुक पक्षाला सत्तेतून हद्दपार करावे लागेल, हे आमचे ध्येय आहे, असे सांगून अण्णामलाई यांनी भर पत्रकार परिषदेतच स्वतःची पादत्राणे काढून बाजूला केली.