नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी भाजपचे वादात सापडलेले ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी थेट संसद भवन गाठले. आक्षेपार्ह ध्वनीचित्रफितींमुळे विरोधकांकडून जोरदार टीका आणि कारवाईची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आल्याची चर्चा आता रंगली आहे. सोमय्या यांनी मात्र याचा इन्कार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरमधील महिलेवरील अत्याचारासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरू असतानाच संसद भवनात आलेल्या सोमय्यांना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे नेमके काम काय होते व ते कोणाला भेटायला आले होते, याची माहिती देण्यास सोमय्या यांनी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीला नकार दिला. ‘तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली का’, या प्रश्नावर, सोमय्यांनी ‘नाही’ एवढेच सांगितले. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची माहिती ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या केंद्रीय तपास यंत्रणांना दिली होती. या संदर्भात सोमय्या वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये फूट पडल्यानंतर मात्र सोमय्यांनी एकाही नेत्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आणलेले नाही. उलट, ते स्वत: नको त्या कारणांसाठी वादात भोवऱ्यात अडकल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला आले होते. यावेळी आक्षेपार्ह चित्रफितींबाबत विचारले असता सोमय्या अजिबात विचलित झाले नाहीत. चेहऱ्यावरील भावही न बदलता सोमय्यांनी, ‘या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे प्रकरण नेण्याची गरज नाही’, असे सांगितले. गाठीभेटी घेऊन संसदेच्या आवारातून बाहेर पडलेले सोमय्या घाईगडबडीत दिसले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर त्रासलेले वा अपराधीपणाचे भाव नव्हते. त्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यासही टाळाटाळ केली नाही. अत्यंत निवांत भासणाऱ्या सोमय्यांनी स्पष्टपणे स्वत:ची मते मांडली. ‘मी कोणाचेही नुकसान केलेले नाही. राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांशी माझे बोलणे झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे’, असे सोमय्या यांचे म्हणणे होते.

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची ‘ईडी’ व ‘सीबीआय’कडून होत असलेली चौकशी अधिक महत्त्वाची आहे. अनिल परब यांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनाही ‘ईडी’ने अटक केली. या नेत्यांची प्रकरणे मीच बाहेर काढली होती. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. आणखी काय हवे? – किरीट सोमय्या, ज्येष्ठ भाजप नेते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya reached parliament house on the first day of monsoon session to meet amit shah zws
Show comments