सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील संभल येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाजपा नेता एका अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपंग व्यक्ती भाजपाविरोधात बोलत होता, तसंच यासोबत अखिलेश यादवला मतदान देणार असल्याचंही सांगत होता. यानंतर भाजपा नेत्याचा संताप झाला आणि त्याने अपंग व्यक्तीला त्रास देण्यास सुरुवात केली.
काय आहे प्रकरण –
ही संपूर्ण घटना एसडीएम ऑफिसच्या समोर घडली आहे. अमरोहा येथील भाजपा नेता मोहम्मद मियाँ रस्त्यावर एका अपंग व्यक्तीशी वाईट पद्धतीने वागत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला ते काठी दाखवून अपंग व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर ती काठी त्याच्या तोंडाजवळ नेऊन घुसवण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न ते सारखा करतात. अपंग व्यक्ती मात्र यानंतरही आपण अखिलेश यादव यांनाच मतदान देणार असल्याचं सांगत आहे.
BJP leader Mohammad Miya assaulting specially-abled youth in Sambhal after the latter passed negative remark about BJP leaders. The youth, who could barely put up a fight, can be heard saying ‘Vote dunga Akhilesh ko’ pic.twitter.com/eazAzwJzJE
— Piyush Rai (@PiyushRaiTOI) December 25, 2018
या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांचं म्हणणं आहे की, अपंग व्यक्ती नशेत होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत होता. अद्याप आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जर तक्रार आली तर कारवाई केली जाईल असंही पोलीस बोलले आहेत. पक्षानेही या प्रकरणाचा तपास करुन त्यानुसार कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.