गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चिला जात आहे. महाराष्ट्रासह देशात विविध प्रेमप्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’ झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केला जात आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपाने ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्याचं आश्वासन दिलं होतं. अशी एकंदरीत स्थिती असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘लव्ह जिहाद’बाबत मोठं विधान केलं आहे.
‘लव्ह जिहाद’बाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सांगितलं की, लव्ह जिहाद हा केंद्र सरकारच्या अजेंड्याचा भाग नव्हता. माझा विश्वास आहे की, प्रेम हे प्रेम असतं. प्रेमाला कोणतीही मर्यादा असू शकत नाही. जर दोन व्यक्ती निखळ प्रेमातून एकत्र येत असतील तर त्याचा आदर केला पाहिजे. पण महिलांना आंतरधर्मीय विवाहात फसवलं जात असेल तर याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजं.”
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “लव्ह जिहाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्याचा भाग कधीच नव्हता. आजही ‘लव्ह जिहाद’सारखा कोणताही विषय मोदी सरकारच्या अजेंड्याचा भाग नाही. मोदी सरकारचा अजेंडा नेहमीच विकास आणि पुनर्विकासावर केंद्रीत असतो. देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर आहे.”
हेही वाचा- लव्ह आणि जिहाद माहित आहे, पण लव्ह-जिहाद माहिती नाही: सुप्रिया सुळे
विशेष म्हणजे १६ मे रोजी भाजपा नेते व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ‘लव्ह जिहाद’विरोधी भूमिका मांडली आहे. आमच्या सरकारने ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘दहशतवादी कारवाया’ अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. राज्यात अशा गोष्टींना अजिबात थारा दिला जाणार नाही, अशी शिवराज सिंह चौहान म्हणाले होते. याबाबतचं वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे.