मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे भाजपा नेत्या, पूजा दादू यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे. गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. यानंतर पूजा दादू यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी पूजा यांना मृत घोषित केलं.
पूजा दादू या नेपानगरचे माजी आमदार, कै. राजेंद्र दादू यांच्या कन्या होत्या. तर, पूजा दादू यांची मोठी बहीण मंजू दादू मंडी मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत. रविवारी ३० वर्षीय, पूजा दादू यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तातडीनं पूजा यांना बुरहानपूरच्या संजय नगर येथील रूग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी पूजा दादूयांना तपासून मृत घोषित केलं.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचं प्रकरण दिसत असल्याचं वरिष्ठ अधिकारी देवेंद्र पाटीदार यांनी सांगितलं.
“पूजा दादू यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला? यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही,” असं भाजपा जिल्ह्याध्यक्ष मनोज लाधवे म्हणाले.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच खांडवा लोकसभा खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांनी पूजा दादू यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.