नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतरही भाजप नेत्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरील हल्लाबोल सोमवारी चालू ठेवला. ‘भारताची धर्मनिरपेक्ष प्रवत्ती समजून घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे’, अशी टिप्पणी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ओबामांचे नाव न घेता केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील भारत हा एकमेव देश आहे, जिथल्या ऋषींनी, संतांनी भारतातील लोकांनाच नाही तर, संपूर्ण विश्वाला आपल्या कुटुंबाचा भाग मानले, ही बाब विसरू नये. आम्ही कधीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही. मुस्लीम देशांमध्ये देखील इस्लामचे सर्वच्या सर्व ७२ पंथ दिसणार नाहीत पण, ते केवळ भारतात आढळतील. मुस्लिमांसंदर्भात भारताबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अमेरिकेने किती मुस्लिम देशावर हल्ला केला हे त्यांना माहिती आहे, अशी कडवी टीका राजनाथ सिंह यांनी केली.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘सीएनएन’ला मुलाखतीमध्ये, भारताने अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण केले नाही तर देशाचे तुकडे होऊ शकतात, असा इशारा दिला होता. ओबामांचे हे मत फेटाळत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओबामांवर शरसंधान साधले होते. ओबामांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात ६ मुस्लिम देशांवर हल्ले केल्याचे सीतारामन म्हणाल्या. त्यानंतर हरदीप पुरी, नेते जय पांडय़ा आदींची ओबामांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने परदेशात जाऊन भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा खोटा प्रचार करत असतात. उलट, राहुल गांधींची आजी इंदिरा गांधी यांना आणीबाणी लागू करून देशवासीयांच्या अधिकारांचे हनन केले होते, अशी टीका हरदीप पुरी यांनी केली. चीनमध्ये शिंजियांग प्रांतात मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराची तुलना करत भारताला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असे पांडा यांनी ठणकावले. त्यावर, निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केलेल्या ६ देशांमध्ये मुस्लीम अल्पसंख्याक नाहीत. तिथे अमेरिकेने केलेला हल्ला तिथल्या अल्पसंख्याकांवर नव्हे, सैनिकांवर केला होता, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader rajnath singh criticized barack obama over indian democracy zws