सध्या देशात छत्तीसगडसह एकूण पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रतन दुबे असं हत्या झालेल्या भाजपा नेत्याचं नाव आहे. दुबे हे बस्तर जिल्ह्याच्या नारायणपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा नेते रतन दुबे हे आज (शनिवार, ०४ नोव्हेंबर) नारायणपूरच्या कौशल नार गावात आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर भयावह हल्ला केला. या हल्ल्यात रतन दुबे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर छत्तीसगडचे भाजपा प्रभारी ओम प्रकाश माथुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

‘एएनआय’ वृत्त संस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत ओम प्रकाश माथुर म्हणाले, “आताच मला माहिती मिळाली आहे की, बस्तर जिल्ह्याच्या नारायणपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष रतन दुबे हे कौशल नार गावात कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. यावेळी काही नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करत त्यांची निर्घृण हत्या केली. मी कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या इतर नेत्यांना आवाहन करतो की, या हत्येचा बदला आपण निश्चित घेऊ. भारतीय जनता पार्टी रतन दुबे यांच्या कुटुंबाबरोबर आहे.”

“मला वाटतं की, नक्षलवादी हताश झाले आहेत. त्यांना भीती वाटत आहे की, जर छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आली तर आपण जिवंत राहणार नाही. त्यामुळे ते सातत्याने ‘टार्गेट किलिंग’ करत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे माझं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, या सर्व बाबींचा सामना करत आपण निवडणुकीत ठामपणे उभे राहू आणि निवडून येऊ आणि येत्या काळात नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करू,” अशी प्रतिक्रिया माथुर यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ratan dubey murder in baster narayanpur chhattisgrah attacked by naxal om prakash mathur reaction rmm