भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाहनवाज हुसैन हे मुंबई दौऱ्यावर होते त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली ज्यामध्ये ब्लॉकेज असल्याचं आढळलं. त्यानंतर त्यांना एक स्टेन लावण्यात आला आहे तर लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन हे मुंबईत आशिष शेलार यांच्या निवासस्थानी आले होते. वांद्रे या ठिकाणी ते आशिष शेलार यांच्या घरी आले त्याचवेळी त्यांना त्रास जाणवू लागला. ज्यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांना खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे.
शाहनवाज हुसैन यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समजताच त्यांना भेटण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लीलावती रुग्णालय गाठलं. याआधीही शाहनवाज हुसैन यांना जेव्हा हृदयाविषयी त्रास जाणवला होता तेव्हा त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.