Ranya Rao Gold Smuggling: कन्नड अभिनेत्री रान्या रावला ३ मार्च रोजी संध्याकाळी बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी असल्याचे सांगितले जाते. रान्या रावने मागच्या काही महिन्यात दुबईच्या अनेक वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI) तिच्या हालचालीवर नजर ठेवली होती. रान्या रावच्या अटकेनंतर सोनेतस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते, अमित मालवीय यांनी एक्सवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अभिनेत्री रान्या रावबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

अमित मालवीय यांनी हा फोटो शेअर करताना सदर प्रकरण आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले असल्याचा संशय व्यक्त केला. रान्या रावला तस्करी करण्यात सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, काही राजकीय नेते सहकार्य करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे, त्यानंतर अमित मालवीय यांनी सदर फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केला.

“रान्या राव तस्करी प्रकरण आता कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या फोटोत मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री जी. परमेश्वरही दिसत आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री डीके शिवकुमार हे या प्रकरणाचा राजकारणाशी संबंध नसल्याचे म्हणत होते”, असेही अमित मालवीय म्हणाले आहेत.

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली. तिच्याकडून १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. रान्या रावने मागच्या वर्षभरात गल्फ देशांमधल्या १० तरी फेऱ्या केल्या आहेत. तसंच ५ मार्चच्या आधीच्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

अभिनेत्री रान्या राव ही कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. पोलीस महासंचालक दर्जा असलेल्या के. रामचंद्र राव यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? हे तपासण्यासाठी कर्नाटक सरकारने अतिरीक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्यावर जबाबदारी दिली आहे. के. रामचंद्र राव यांनी मात्र सावत्र मुलीशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिच्या अटकेनंतर आपल्यालाच धक्का बसला, असेही ते म्हणाले.