Pulkit Arya’s Resort Demolished: १९ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पुलकित आर्याच्या मालकीच्या रिसॉर्टचे मध्यरात्री पाडकाम करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. धामींच्या आदेशानंतर ऋषिकेशमधील ‘वनतारा’ रिसॉर्टवर शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दिली आहे.

भाजपा नेत्याच्या मुलाच्या रिसोर्टमधून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला, विनयभंग झाल्याचा पीडितेच्या वडिलांचा आरोप

उत्तराखंडच्या हरिद्वारमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुलिकत पुत्र आहेत. दरम्यान, पुलकित यांच्या या रिसॉर्टमधून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा मृतदेह पोलिसांना चिल्ला पावर हाऊस परिसरात आढळून आला आहे. याप्रकरणी पुलकित यांच्यासह रिसॉर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता न्यायालयीन कोठडीत आहेत. वैयक्तिक वादानंतर तरुणीला रिसॉर्टजवळील कालव्यात ढकलून दिल्याची कबूली पोलीस चौकशीत या आरोपींनी दिली आहे.

“पीडित तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार २० सप्टेंबरला पुलकित आर्या यांनी तपासाची दिशाभूल करण्यासाठी नोंदवली होती. या प्रकरणात पुलकित आणि त्यांच्या साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय पीडितेच्या वडिलांना होता. या संदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप संदेश पीडितेच्या वडिलांकडे आहेत” अशी माहिती पौरी गर्हवालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यशवंत सिंह यांनी दिली आहे.


“पीडित तरुणी आणि आरोपी रविवारी ऋषिकेशला गेले होते. या ठिकाणाहून परतत असताना पुलकित आणि पीडितेचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला चिल्ला कालव्यामध्ये ढकलून दिले”, असे सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Story img Loader