भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं काही दिवसांपूर्वी गोव्यात निधन झालं आहे. यानंतर सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. सोनाली फोगट यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलं नसून तपास सुरू आहे. दरम्यान, या हत्येसंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या फार्महाऊसमधून तीन महागड्या कार आणि फर्निचर गायब असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.
आरोपी सुधीर सांगवान याचा सोनाली फोगट यांच्या संपत्तीवर डोळा होता, अशी माहिती तपासातून समोर आली होती. त्यानंतर गोवा पोलिसांनी सखोल तपास केला असता, सोनाली फोगट यांच्या हरियाणातील फार्महाऊसमधून तीन महागड्या कार आणि महागडे फर्निचर गायब झाल्याची नवी माहिती मिळाली आहे. आरोपी सांगवान हा केवळ फोगट यांची मालमत्ता हडपण्यासाठी उत्सुक नव्हता तर तो फोगट यांचं फार्महाऊस २० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती गोवा पोलिसांनी आपल्या निवेदनात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहने होती, ही वाहने सध्या गायब आहेत. तसेच फोगट यांच्या फार्महाऊसची किंमत जवळपास ११० कोटी रुपये इतकी आहे. सोनाली फोगट यांचा पीए आणि आरोपी सांगवान याला फोगट यांचं फार्महाऊस २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घ्यायचं होतं. त्यासाठी तो एक करार करू इच्छित होता. ज्यामध्ये तो संबंधित मालमत्तेसाठी वर्षाला केवळ ६० हजार रुपये देण्यास तयार होता.
हेही वाचा- सोनाली फोगट मृत्यू प्रकरण: मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं CCTV फुटेज आलं समोर, गूढ वाढलं
आरोपी सांगवान याला अटक केल्यानंतर त्याने सोनाली फोगटच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिसळल्याची कबुली दिली आहे. तसेच ते ड्रिंक्स पिण्यासाठी बळजबरी केल्याचंही सांगवानने सांगितलं आहे. गोवा पोलीस तपास करण्यासाठी हिस्सारला पोहोचले असता, त्यांना सोनाली फोगट यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीत विविध राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक आढळले. पोलिसांनी फोगट यांच्या डायरीसह एक लॉकरही ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.