भारतीय जनता पार्टीने नुकतीच संसदीय मंडळाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्थान देण्यात आलं नाही. यापूर्वी गडकरी हे या मंडळाचे सदस्य होते. भाजपाच्या संसदीय मंडळाची पुनर्रचना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी संसदीय मंडळाच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
संसदीय मंडळातील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी पक्षाअंतर्गत निवडणुका होत नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीनंतर सदस्यांची नियुक्ती केली जाते, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक ट्वीट करत थेट मोदींवर हे आरोप केले आहेत.
हेही वाचा- BJP Parliamentary Board: भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळलं
स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “तत्कालीन जनता पक्ष आणि आताच्या भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात संसदीय मंडळातील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवडणुका घेतल्या जायच्या. पक्षाच्या राज्यघटनेत त्याबाबतची तरतूद आहे. पण आता भाजपामध्ये निवडणुका होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने प्रत्येक पदासाठी सदस्यांची नियुक्ती केली जाते. स्वामी यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर असे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा- “नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय”, काँग्रेसचं खोचक ट्वीट; पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला!
दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “आज मी कोलकात्यात होतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्या एक धैर्यवान व्यक्ती आहेत. त्यांनी बंगालमध्ये कम्युनिस्टांचं अस्तित्व संपवलं. सीपीएमविरुद्धचा त्यांचा लढा मला कौतुकास्पद वाटतो.”