Haryana Crime News : हरियाणामधील सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आल्याची घटना सोनीपतमध्ये घडली आहे. या घटनेमुळे हरियाणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

माहितीनुसार, भाजपाचे मुंडलाना मंडळ अध्यक्ष सुरेंद्र जवाहर यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ९:३० वाजता जवाहर गावात ही घटना घडली. सुरेंद्र जवाहर यांची हत्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्याच एका व्यक्तीने केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरेंद्र जवाहर यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, जमिनीच्या वादातून सुरेंद्र जवाहर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीचं नाव अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. पण ही घटना जमिनीच्या आणि मालमत्तेच्या वादातून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जवाहरला जमिनीवर पाऊल ठेवू नका, अशी धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर शुक्रवारी रात्री या दोघांमध्ये आणखी वाद झाला. यानंतर आरोपीने सुरेंद्र जवाहर यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुरेंद्र जवाहर हे एका दुकानात पळत असल्याचं दिसून येत आहे, तर आरोपी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडून गोळ्या झाडत असल्याचं दिसून येत आहे. या गोळीबारात सुरेंद्र जवाहर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी या हत्येच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.