जद(यू) आणि राजदचे विलीनीकरण होणार असल्याने बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना पदावरून दूर करण्यात येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केला. त्यामुळे मांझी यांनी स्वत:च राजीनामा द्यावा आणि नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस करावी, अशी सूचनाही मोदी यांनी केली. संक्रांतीनंतर जद(यू) आणि राजदचे विलीनीकरण झाल्यानंतर मांझी यांना पदावरून दूर करण्यात येईल, असे वाटते. त्यामुळे त्यांनी स्वत: राजीनामा देऊन नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस करावी, असा सल्ला आपण त्यांना देऊ, असेही मोदी म्हणाले. एके काळी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दोन पक्षांचे विलीनीकरण झाल्यावर बिहार राज्यात आणखी काही काळासाठी राजकीय अस्थैर्याची स्थिती निर्माण होईल, असेही मोदी म्हणाले.