भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पंजाब पोलिसांनी बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी तजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पंजाब पोलीस बग्गा यांच्या शोधात होते. याआधीही पंजाब पोलिसांचे पथक दिल्लीत आले होते, मात्र रिकाम्या हाती परतावे लागले होते. सीएम केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. बग्गा यांच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांनी आम आदमी पार्टी आणि पंजाबमधील भगवंत मान सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपा नेत्याच्या अटकेबाबत कपिल मिश्रा म्हणाले, “ताजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ५० कर्मचाऱ्यांनी अटक करून त्यांच्या घरातून नेले. तजिंदरपाल सिंग बग्गा हा सच्चा सरदार आहे, त्याला असं घाबरवता येत नाही किंवा कमकुवत करता येत नाही, खऱ्या सरदाराची इतकी भीती का?” दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते प्रशांत उमराव यांनी ट्विट केले की, “भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून अटक केली आहे. पंजाब पोलिसांचे ५० कर्मचारी त्याच्या घरी आले आणि स्थानिक पोलिसांना न कळवता बग्गा यांना दहशतवाद्यांप्रमाणे अटक केली.”
भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा म्हणाले, “आज सकाळी १०-१५ पोलीस आमच्या घरी आले आणि त्यांनी ताजिंदरला ओढून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी मी माझा मोबाइल फोन उचलला तेव्हा पोलिसांनी मला दुसऱ्या खोलीत नेले आणि तोंडावर मारलं.
दिल्लीतील उत्तम नगरमधील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बल्यान यांनी बग्गा यांच्या अटकेबाबत ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.