४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल लागून आज २६ दिवस झाले आहेत. तरीही निकालांवरच्या चर्चा आणि प्रतिक्रिया थांबताना दिसत नाहीयेत. प्रत्येक रामभक्ताने मोदींना मत दिलं असेलच असं नाही असं आता भाजपा नेत्या उमा भारतींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या चारही राज्यांमध्ये भाजपाला फटका बसला. राम मंदिर उभारुनही उत्तर प्रदेशात म्हणावं तसं यश भाजपाला मिळालं नाही. यावर आता उमा भारतींनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाबरी पाडली गेल्यानंतरही भाजपाची मतं घटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबरी पाडल्यानंतरही भाजपाचा पराभव झाला होता

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यासाठी मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरता येणार नाही. १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडल्यानंतरही भाजपाला पराभवाचा फटका बसला होता. तरीही आम्ही राम मंदिर बांधलं. राम मंदिर हे आमच्या अजेंड्यावर होतं आणि आम्ही ते पूर्ण केलं. आम्ही राम मंदिर हे कधीही मतांशी जोडलेलं नाही. याच प्रमाणे मथुरा आणि काशी या ठिकाणी असलेल्या धर्मस्थळांचेही वाद आहेत. मात्र आम्ही त्या प्रश्नांचा संबंध आम्हाला मिळणाऱ्या मतांशी जोडत नाही. हिंदू समाजाचा एक प्रकारचा स्वभाव आहे, तो समजून घेतला पाहिजे. सामाजिक व्यवस्था धर्माशी जोडायला नको असंही उमा भारतींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- निवडणूक निकालाच्या बोधकथा…!

प्रत्येक रामभक्ताचं मत आपल्याला मिळेल हा अहंकार बाळगू नये

प्रत्येक रामभक्ताचं मत आपल्यालाच मिळेल हा अहंकार भाजपाने बाळगायला नको. तसंच हा विचारही चुकीचा आहे की जो आपल्याला मत देत नाही तो रामभक्त नाही हा विचारही गैर आहे. ज्यांनी मतं दिली नाहीत तेदेखील रामभक्त आहेत. उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला कारण निष्काळजीपणा नडला. मात्र यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरता येणार नाही असंही उमा भारती म्हणाल्या. उत्तर प्रदेशातल्या ८० पैकी ३३ जागांवरच भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवता आला. मागच्या निवडणुकांमध्ये भाजपाने ७० हून जास्त जागा जिंकल्या होत्या.

इस्लाम मानणारे लोक

इस्लाम मानणारे लोक हे सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था एकच आहे अशा दृष्टीने पाहतो. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेप्रमाणे त्या वर्गाचं मतदान केलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला अपयश आलं याचा अर्थ असा होत नाही की लोकांची रामावरची श्रद्धा कमी झाली असंही उमा भारतींनी म्हटलं आहे. भाजपात अहंकार आला आहे असं मला वाटत नाही. आम्ही पराभावाचं चिंतन करतो आहोत. पंतप्रधान यांनी कधीही स्वतःला पंतप्रधान म्हटलेलं नाही ते स्वतःचा उल्लेख प्रधानसेवक असा करतात. विकासाच्या अजेंड्यावर ते काम करत आहेत.असंही मत उमा भारतींनी मांडलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader uma bharti on bjp performance in lok sabha election in uttar pradesh what she said scj