Sanjay Singh Gangwar : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केलेल्या एका विधानाची सध्या देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. “गायीच्या गोठ्यात झोपलं किंवा गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो”, असं अजब विधान उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केलं आहे. संजय सिंह गंगवार हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील पिलीभीत या ठिकाणी एका गोशाळेचं उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना मंत्री संजय सिंह गंगवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

मंत्री संजय सिंह गंगवार नेमकं काय म्हणाले?

“जर दररोज सकाळ-संध्याकाळी गायीच्या पाठीवर हात फिरवला, गायीची सेवा केली तर ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल. जो व्यक्ती ब्लड प्रेशरची गोळी घेत असेल त्याच्या गोळ्यांची संख्या अर्ध्यावर येईल. गायीची १० दिवस सेवा केली तर आत्ता जो व्यक्ती २० एमजीची गोळी घेत असेल तर काही दिवसांत फक्त १० एमजीचेच औषध घ्यायला सुरुवात करेल. तसेच कर्करोग असणाऱ्या रुग्णांनी गायीच्या गोठ्याची साफसफाई करायला सुरुवात केली आणि गोठ्यात झोपायला सुरुवात केल्यास कर्करोगही बरा होतो”, असा दावा मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!

दरम्यान, मंत्री संजय सिंह गंगवार यांनी उत्तर प्रदेश राज्यात प्रत्येक पंचायत आणि नगरपालिकांमध्ये गोशाळा स्थापन करण्यात येत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भटकी गुरे चरत असल्याबद्दल तक्रार करणे टाळले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या या विधानावर टीका केली आहे. तसेच अनेकांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केला आहे. संजय सिंह गंगवार हे पिलीभीत मतदारसंघातून दोन वेळा आमदार असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.

Story img Loader