एकीकडे देशात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या विषयावरून धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा चालू असताना दुसरीकडे हिंदू-मुस्लीम सौहार्दाच्या संबंधांचेही आदर्श उदाहरणं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे माजी आमदार आणि पौरी महानगरपालिकेचे प्रमुख यशपाल बेनाम यांनी मुस्लीम मुलाशी ठरवलेला आपल्या मुलीचा विवाह समाजातून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला आहे.
नेमकं काय घडलं?
भाजपा नेते यशपाल बेनाम यांनी आपल्या मुलीचा विवाह तिच्याबरोबर महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या एका मुस्लीम मुलाशी ठरवला होता. २८ मे रोजी लग्नसोहळा पार पडणार होता. त्याची सर्व तयारी झाली होती. तीन महिन्यांपूर्वीच हे लग्न ठरलं होतं. या प्रेमविवाहाबाबत त्यांनी सगळ्यांनाच पूर्वकल्पना दिली होती. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही छापल्या आणि वाटल्या गेल्या. पण ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडि
यावर व्हायरल होऊ लागताच या लग्नाची चर्चा वाढली. काही लोकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. एवढा, की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या झेंड्यांखाली अनेकांनी त्यांच्या घरावर शुक्रवारी मोर्चाच काढला. यावेळी त्यांच्या नावाने घोषणाबाजी झाली. बेनाम यांना लग्नाच्या विरोधात काही संदेशही येऊ लागले. हा सगळा प्रकार यशपाल बेनाम यांच्यासाठी धक्कादायक होता. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, विवाहाला किंवा दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी त्यांनी हा विवाहच सध्या रद्द केला आहे.
“आधी सगळे लग्नाला तयार होते, पण हळूहळू…”
“मी एका मुस्ली मुलाशी माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. सगळ्यांना याची माहिती दिली होती. तेव्हा सगळ्यांनी या लग्नाला होकार दिला होता. हे २१वं शतक आहे. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच अधिकार आहे. पण हळूहळू असं वातावरण तयार झालं जे या लग्नासाठी योग्य नव्हतं. त्यामुळे २६ मे ते २८ मे या कालावधीत ठरवण्यात आलेले लग्नाचे सर्व विधी आम्ही रद्द केले आहेत”, अशी प्रतिक्रिया बेनाम यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
“राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो…” नाना पटोलेंचं वक्तव्य चर्चेत
“माझ्यासाठी मुलाचा आनंद महत्त्वाचा”
“एक पिता म्हणून मी माझ्या मुलीच्या प्रेमाला मान्यता दिली. आम्ही त्या मुलाच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली आणि लग्नाला दोन्ही बाजूंनी होकार दिला. पण मीही एक लोकप्रतिनिधी आहे. नगरपालिकेचा प्रमुख आहे. इथल्या लोकांसाठीही माझी काहीतरी जबाबदारी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लग्न रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सामाजिक सलोखा आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहावं यासाठी हा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
“लोक म्हणाले की तुम्ही निमंत्रण पत्रिकाच छापू नका”
“हे लग्न दोन-तीन महिन्यांपूर्वीच ठरलं होतं. तेव्हा मी सगळ्यांना याची माहिती दिली होती. पण नंतर लोक मला सांगायला लागले की तुम्ही निमंत्रण पत्रिकाच छापू नका. पण मी कुणापासूनही काहीही लपवत नव्हतो. ती निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आणि अनेक संघटनांकडून मला इशारे यायला लागले. मला हे लग्न पोलीस संरक्षणात करायचं नव्हतं. मी मुलाच्या कुटुंबीयांचा आभारी आहे की त्यांनी यात आम्हाला सहकार्य केलं”, असं यशपाल बेनाम म्हणाले.
संघातील अनेक पदाधिकाऱ्यांकडून फोन!
दरम्यान, यशपाल बेनाम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातीलही अनेक पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला फोन आल्याचं म्हटलं आहे. “या जगात सर्व प्रकारचे लोक असतात. काही माझ्याशी व्यवस्थित बोलले आणि काहींनी अरेरावीच्या भाषेत संभाषण केलं. पण त्यांच्या मते त्यांचा राग बरोबर होता, जसा माझ्यामते माझं मुलीबद्दलचं प्रेम योग्य आहे. त्या मुलाचे कुटुंबीय खूप चांगले आहेत. ते फक्त मुस्लीम आहेत, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. अनेक लोकांनी मला या लग्नाविरोधात इशारा दिला. ते म्हणाले की यामुळे माझी राजकीय कारकिर्द धोक्यात येईल. पण मी म्हणालो, माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. माझी राजकीय कारकिर्द ही स्वतंत्र बाब आहे”, असं बेनाम म्हणाले.
यशपाल बेनाम आधी काँग्रेसबरोबर होते. पण नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. २००७ साली ते अपक्ष म्हणून काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून पौरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांनी तेव्हा भाजपाच्याच तीरथ सिंह रावत यांचा पराभव केला होता.