भाजपच्या बिहारमधील पराभवाबाबत जेटली यांची कबुली
बिहारमध्ये महाआघाडीच्या ताकदीचा अंदाज आला नाही, अशी कबुली देत पक्षातीलच काही नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे भाजपला फटका बसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मान्य केले. महाआघाडीतील घटक पक्षांची मते परस्परांकडे उत्तम पद्धतीने वळल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप संसदीय मंडळाची सोमवारी नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा मुद्दा व लोकप्रियता याचा फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती ओळखता आली नाही. तसेच महाआघाडीतील नेत्यांचे ऐक्य हेदेखील पराभवाला प्रमुख कारण ठरल्याचे विश्लेषण पक्षाने केले आहे. तत्पूर्वी मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा व वेंकय्या नायडू यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
भाजपच्या काही नेत्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावरून जेटलींनी नाराजी व्यक्त केली. बिहारचे निकाल हे केंद्राच्या कामगिरीवरील सार्वमत नाही. तसेच भाजपची मते फारशी कमी झाली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. भारत हा जगातील सर्वात सहिष्णू समाज असून देशातील एखादी घटना देशाला असहिष्णू करू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या आरक्षण समीक्षेसाठी समिती नेमण्याच्या वक्तव्यामुळे पराभव झाला का, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे जेटली यांनी टाळले. जेटली म्हणाले की, भाजप सुरुवातीपासूनच सामाजिक आधारावर आरक्षणाचे समर्थन करतो. संघाचेदेखील हेच मत आहे. एका वक्तव्यावर निवडणूक ठरत नाही. प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगळे असते, असे सांगून जेटली यांनी वेळ मारून नेली.
निकालानंतर भाजपमधूनच सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. बिहारमधील भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव तसेच अश्विनीकुमार चौबे यांनी भागवत यांच्या वक्तव्याचा संबंध पराभवाशी जोडला. माजी मंत्री अरुण शौरी यांनी तर बिहारमध्ये भाजपचे सगळे गणितच चुकले, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती.
दरम्यान, प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता कमी आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
‘मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हवा होता’
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार भाजपने घोषित केला नाही, त्यामुळे नितीशकुमार यांना फायदा झाल्याचे मत पक्षातील काही जणांनी व्यक्त केले. नकारात्मक प्रचार रोखण्यात पक्षाच्या नेत्यांनीही प्रयत्न केले नाहीत, अशी नाराजी काही नेत्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी हे जर पक्षाचा चेहरा होते तर मग त्यांची प्रतिमा मलिन करणारी वक्तव्ये विरोधकांनी केल्यावर त्याचा जोरकसपणे प्रतिवाद का झाला नाही, असा प्रश्न विचारला गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा