केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आयपीएलच्या वादात अडकलेल्या ललित मोदी यांना केलेल्या मदतीनंतर काँग्रेस आक्रमक झालेला असताना भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी स्वपक्षाच्याच बडय़ा नेत्यावर या वादाचे खापर फोडले आहे. स्वराज यांच्याविरोधात सक्रिय असलेल्या गटाचे प्रमुख व केंद्रात मंत्री असलेल्या या नेत्याची तुलना ‘आस्तिन का साप’ अशी करून आझाद यांनी पक्षाच्या एकसंधतेला ‘ट्विटर’वर टांगले. आझाद यांच्या ट्विटनंतर भाजप वर्तुळात खळबळ माजली. आझाद यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्याचे टाळत खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी आझाद विनापुरावा बोलत नाही, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांमध्येच परस्परांविरोधात कारस्थान रचले जात आहे.
आझाद यांच्या ट्विटमुळे केंद्रातील मंत्र्यानेच स्वराज यांनी ललित मोदी यांच्या मदतीसाठी केलेल्या ई मेल्स वृत्तवाहिनीला पुरविल्याची चर्चा ल्यूटन्स झोनमध्ये रंगली आहे. हा मंत्री कोण याबाबत तर्कवितर्क लढविणे सुरू झाले आहे. दरम्यान, दिल्ली क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीदरम्यान आझाद यांचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी वारंवार खटके उडाले होते. त्याचाही संदर्भ आझाद यांच्या ट्विटनंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी दिला आहे. आझाद यांच्या ट्विटवर भाजपच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजीच्या आरोपावरून चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेल्या ललित मोदी यांची परदेशात स्वराज यांनी मदत केली होती. ही मदत मानवतेच्या मुद्यावर केल्याचे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वराज यांची पाठराखण केली होती. स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस नेते ठाम आहेत. स्वराज यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वराज यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी ७०० कोटी रुपयांच्या सट्टा प्रकरणात अडकलेल्या ललित मोदी यांची मदत करण्यामागे स्वराज याचां कोणता हेतू होता, असा प्रश्न उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनीदेखील स्वराज यांच्यावर टीका केली. ललित मोदींना मदत करण्यामागे कोणते कारण होते? ते जाणून घेण्याचा अधिकार देशवासीयांना आहे. त्यामुळे स्वराज यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्रिपाठी यांनी केली.
माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. पारदर्शकता व भ्रष्टाचार संपविण्याच्या आणाभाका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी मौन का आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा